Pandharpur : पंढरपुरात संत नामदेव स्मारक (Sant Namdev Memorial) उभारण्याचा २०१४ पासून प्रयत्न सुरू होता. सुरवातीला या स्मारकाच्या उभारणीसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु जागा उपलब्ध होत नसल्यामुळे जागेच्या अभावामुळे स्मारक उभारण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता.अखेर आता पंढरीतील संत नामदेवांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न सुटला आहे.
पंढरपूरमधील रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा महाराष्ट्र शासनाला मिळाली आहे. त्यातील काही जागा संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी मिळणार आहे. या स्मारकासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च गृहित धरण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे स्मारक साकारण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या स्मारकासाठी विविध सात संस्थांकडून अभिप्राय मागविण्यात येत असून त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्मारकाचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पंढरपुरात रेल्वेच्या मालकीची मोठी जागा आहे. त्यापैकी काही जागा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत होते. सरकारच्या या प्रयत्नाला आता यश मिळाले आहे. कारण रेल्वेच्या मालकीची १६ एकर जागा महाराष्ट्र सरकारला देण्यात आली आहे. त्या बदल्यात रेल्वेला पालघर येथील जागा राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
दरम्यान, २४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संत नामदेव महाराजांच्या स्मारकासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्मारकाबाबत ही माहिती दिली. संत नामदेव महाराजांचे स्मारक पंढरपुरात उभारण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषदेनेही सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता. आता समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.