● शताब्दी पर्वात देशभरात एक कोटींहून अधिक संघ कार्यकर्ते होणार सहभागी
● देशभरात एकूण सव्वा लाखांहून अधिक शाखा
● मंडलांमधील संघ विस्तारात ६७ टक्क्यांची वाढ
● संघ स्वयंसेवक समाजसेवा, कामगार संघटना, शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटक कार्यरत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार व समाज परिवर्तन यावर भर देण्यात येणार असून अधिक गुणात्मक आणि व्यापक काम करण्याचा संकल्प करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची सांगता (रविवार, २३ मार्च २०२५) झाली. या सभेत बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेले हल्ले व अनन्वित अत्याचारसंबंधी चिंता व्यक्त करणारा व बांगलादेशातील हिंदू समाजासाठी एकी दाखविण्याचे आवाहन करणारा ठराव पारित करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि. २१ ते २३ मार्च २०२५ दरम्यान बंगळुरू येथे झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून १,४४३ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
प्रतिनिधी सभा व संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याची सद्यस्थिती संबंधाने सोमवारी (२४ मार्च २५) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव यांनी माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.
प्रतिनिधी सभेबद्दल अधिक माहिती देताना प्रांत संघचालक प्रा. नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, संघाचा उद्देश हा शताब्दी पर्वाचा मोठा टप्पा साजरा करण्याचा नसून १) आत्मनिरीक्षण करणे, २) संघाच्या कार्याला समाजाने दिलेल्या पाठिंब्यास प्रतिसाद देणे आणि ३) राष्ट्राच्या कार्यासाठी आणि समाजाच्या संघटनेसाठी स्वतःला पुन्हा समर्पित करणे हा आहे. या संकल्पासाठी आगामी काळात संघ विस्ताराचे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच स्व-आधारित व्यवस्था, पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तना’च्या सूत्रांच्या आधारे काम होणार आहे.
संघ शताब्दीत अनेकविध उपक्रम –
संघ शताब्दी वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबद्दल सांगतना प्रांत कार्यवाह डॉ. दबडघाव यांनी सांगितले की,
१. शताब्दी वर्षाची सुरुवात विजयादशमी २०२५ पासून होईल. त्यात संघ गणवेशात स्वयंसेवकांचे तालुका किंवा नगर स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
२. साधारणपणे नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात हर गाव, हर बस्ती, घर-घर (प्रत्येक गाव, प्रत्येक वस्ती आणि घरोघरी) या संकल्पनेनुसार तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात घरोघरी संपर्क मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात स्थानिक शाखांकडून संघ संबंधित माहिती दिली जाईल आणि काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
३. सर्व मंडले किंवा वस्तींमध्ये “हिंदू संमेलने” आयोजित केली जातील. त्यामध्ये भेदभाव न बाळगता सर्वांच्या दैनंदिन जीवनात एकता आणि सुसंवाद, राष्ट्रकार्यात प्रत्येकाचे योगदान आणि पंच परिवर्तनात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग हा संदेश दिला जाणार आहे.
४. तालुका/शहर पातळीवर सामाजिक सद्भाव मेळावे आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये समरसतेने जगण्यावर भर दिला जाईल. सांस्कृतिक पाया आणि हिंदू चारित्र्य न गमावता आधुनिक जीवन जगणे हा या मेळाव्यांचा विषय असणार आहे.
५. जिल्हा पातळीवर नागरिक संवाद मेळावे आयोजित करण्यात येतील. राष्ट्रीय मुद्द्यांवर योग्य दृष्टिकोन मांडण्यावर आणि आज समाजात प्रचलित असलेले चुकीचे विमर्श बाजूला ठेवण्यावर या कार्यक्रमांचा भर असेल.
६.पश्चिम महाराष्ट्र प्रांताकडून युवकांसाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. १५ ते ३० वयोगटातील युवकांसाठी राष्ट्र उभारणी उपक्रम, सेवा उपक्रम आणि पंच परिवर्तन यावर लक्ष केंद्रित करणारे कार्यक्रम मोठ्या संख्येने हाती घेण्यात येणार आहेत. स्थानिक गरजेनुसार या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.
संघ शाखांची स्थिती
आज देशभरात ५१ हजार ५७० ठिकाणी दररोज एकूण ८३ हजार १२९ शाखा आयोजित केल्या जातात, ज्या मागील वर्षीच्या ७३ हजार ६४६ पेक्षा १० हजारांहून अधिक शाखा आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत साप्ताहिक मिलनची संख्या ४ हजार ४३० ने वाढली आहे तर शाखा आणि साप्ताहिक मिलनची एकूण संख्या १ लाख १५ हजार २७६ आहे.
२०२५ पर्यंतच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेची देशातील आकडेवारी..
● एकूण ठिकाणे: ५१ हजार ५७०
● एकूण शाखा (दैनिक): ८३ हजार १२९
● एकूण मिलन (साप्ताहिक): ३२ हजार १४७
● एकूण मंडळी (मासिक): १२ हजार ०९१
● एकूण शाखा + साप्ताहिक मिलन+ मंडळी: १ लाख २७ हजार ३६७
▪️संघ कार्याची प्रांतातील आकडेवारी
या विस्तारात पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील शाखा विस्तारा संबंधाने रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्राचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी सांगितले की, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आज रोजी २४६ ठिकाणी ७८६ शाखा, २८९ ठिकाणी ७१८ साप्ताहिक मिलने व २९४ ठिकाणी ३५९ संघमंडळी असा विस्तार आहे. पुणे महानगरात ५३ ठिकाणी ३१९ शाखा, २४५ साप्ताहिक मिलने असा संघ शाखांचा विस्तार आहे.
रा. स्व. संघ : युवा संघटना
डॉ. दबडघाव पुढे म्हणाले की, संघकार्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दरवर्षी लाखो तरुण, विशेषतः १४-२५ वयोगटातील यातून जोडले जात आहेत. संघ स्वयंसेवक ते कार्यकर्ता असे प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या संघाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत देशभरात एकूण ४ हजार ४१५ प्रारंभिक वर्ग आयोजित केले आहेत. त्यातून २लक्ष २२ हजार ९६२ जण सहभागी झाले होते. त्यापैकी १ लक्ष ६३ हजार हे १४-२५ या वयोगटातील होते. तर २० हजारांहून अधिक जण ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. दुसरीकडे www.rss.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून २०१२ पासून, १२लक्ष ७२ हजार ४५३ हून अधिक नागरिकांनी रा.स्व.संघामध्ये सहभागी होण्यास आपली रुची दाखविली, ज्यात ४६हजार हून अधिक पेक्षा जास्त महिलांचा सहभाग आहे.
▪️मंडल विस्तारात ६७ टक्क्यांची वाढ
संघाच्या प्रशासकीय रचनेनुसार, देशभरात ५८ हजार ९८१ ग्रामीण मंडलांमध्ये विभागलेला आहे. पैकी ३० हजार ७१७ मंडलांमध्ये दैनिक शाखा आणि ९ हजार २०० मंडलांमध्ये साप्ताहिक मिलन सुरु आहेत. एकूण ३९ हजार ९१७ म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत ६७% ची वाढ झाली आहे. तर मंडलांच्या संख्येत ३हजार ५० ने वाढ झाली आहे. संघकार्याचा विस्तार आणि एकत्रिकरणासाठी शताब्दी विस्तारक म्हणून २ वर्षे पूर्णवेळ देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत २ हजार ४५३ स्वयंसेवक सहभागी झाले. असेही डॉ. दबडघाव यांनी सांगितले.
▪️सेवाकार्यांचे विशाल जाळे
प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी सेवा कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, समर्पित वृत्तीने होत असेलली सेवाकार्य हा देशभरात विस्तारलेल्या संघ कार्याचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. आज देशभरात संघ स्वयंसेवकांकडून ८९ हजार ७०६ सेवा प्रकल्प सुरू आहेत, त्यापैकी ४० हजार ९२० शिक्षण क्षेत्रात, १७ हजार ४६१ वैद्यकीय सेवेशी संबंधित, १० हजार ७७९ स्वावलंबन क्षेत्रात आणि २० हजार ५४६ सामाजिक प्रबोधनाशी तसेच इतर उपक्रमांशी संबंधित आहेत. संघाकडून ग्रामीण विकासासाठी ग्राम विकास आणि गो-संरक्षण यासारखे विशेष उपक्रम देखील राबवले जातात.पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा विचार करता प्रांतभरात १हजार २८१ तर पुणे महानगरात ४३० सेवाकार्ये चालविली जात आहेत.
▪️महाकुंभात महाविक्रम
प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभात संघ प्रेरित संस्था आणि संघटनांनी विविध प्रकारचे सेवा, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक कार्यक्रम आयोजित केले. त्यात संघ कार्यकर्त्यांनी केलेल्या दोन विशेष प्रयत्नांचा उल्लेख इथे आवर्जून करावा लागेल.
▪️”सक्षम”द्वारे आयोजित केलेल्या “नेत्रकुंभात” कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी पूर्णपणे मोफत डोळ्यांच्या चाचण्या, चष्म्याचे वाटप, आवश्यक असल्यास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची शिबिरे भरविण्यात आली. याचा लाभ २लक्ष ३७ हजार ९६४ जणांना झाला, तर १लक्ष ६३हजार ६५२ जणांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. तसेच १७हजार ०६९ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ५३ दिवस चाललेल्या या सेवा कार्यात ३०० हून अधिक नेत्र तज्ज्ञ आणि २हजार ८०० कुशल कामगारांनी सहभाग घेतला.
तर पर्यावरण संरक्षण कार्यकर्त्यांनी देशातील अनेक संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेली “एक थाळी-एक थैली मोहीम” या उल्लेखनीय उपक्रमात ७हजार २५८ केंद्रांमधून २हजार २४१ संस्था आणि संघटनांकडून एकूण १४लक्ष १७हजार ०६४ थाळ्या आणि १३लक्ष ४६हजार १२८ पिशव्या गोळा करण्यात आल्या. ज्या कुंभमेळ्यातील विविध मंडपांमध्ये वाटण्यात आल्या. कुंभमेळ्यात थर्माकोल, प्लेट्स किंवा पॉलिथिन बॅग वापरू नयेत या उद्देशाने ही मोहिम हाती घेण्यात आली होती.
▪️पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यास विनम्र अभिवादन
३१ मे २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष सुरु आहे. यासंबंधाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देताना प्रांत संघचालक नानासाहेब जाघव यांनी सांगितले की, अहिल्याबाई होळकर यांचे शौर्य, पराक्रम आणि महानता यांना वंदन करीत लोकमाता अहिल्यादेवी यांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी देशभरात सुमारे २२ हजार कार्यक्रम आणि महिला-केंद्रित ४७२ एकदिवसीय शिखर परिषदा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये ५लक्ष ७५ हजार हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी जन्म त्रिशताब्दी अभिवादन समारोह समिती व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राष्ट्रीय महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतभरातून सुमारे ५०० महिला त्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अहिल्यादेवींचा वाडा, जन्मस्थान, गढी आणि ऐतिहासिक मंदिराला भेट दिली आणि विविध चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवला.
▪️मान्यवरांना आदरांजली
प्रतिनिधी सभेत विशेष रूपाने भारताच्या महान महिला स्वातंत्र्यसेनानी उल्लाळच्या महाराणी अब्बक्का यांना आदरांजली वाहण्यात आली. हे वर्ष त्यांचे ५०० वे जयंती वर्ष आहे. अब्बक्का यांनी दक्षिण कन्नडमधील (कर्नाटक) उल्लाळ संस्थानाचे राज्य यशस्वीपणे चालविले. त्या एक कुशल प्रशासक, अजिंक्य रणनीतीकार आणि महापराक्रमी शासक होत्या.
त्याआधी प्रतिनिधी सभेच्या प्रारंभी देशातील गेल्या वर्षभरात निधन पावलेल्या काही प्रमुख व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. ज्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग, उस्ताद झाकीर हुसेन, विवेक देबरॉय, डॉ. प्रितीश नंदी, एस. एम. कृष्णा, महाराणा महेंद्र सिंह, कामेश्वर चौपाल, वनाचा विश्वकोश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती तुलसी गौडा, धनंजय रामचंद्र घाटे, शिरीष महाराज मोरे, पूर्व विश्वविभाग संयोजक शंकर तत्ववादी, माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान आदींना आदरांजली वाहण्यात आली.
बांगलादेशातील हिंदूंच्या छळाविरुद्ध ठराव पारित
प्रतिनिधी सभेत बांगलादेशातील हिंदुंच्या छळाविरुद्ध ठराव पारित करण्यात आला. त्याविषयी डॉ. दबडघाव यांनी सांगितले की, बांगलादेशात हिंदुंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त करणारा ठराव पारित करण्यात आला. ठरावात बांगलादेशातील हिंदू धार्मिक संस्थांवर करण्यात आलेले हल्ले, क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदुंच्या मालमत्तेचा नाश यांचा उल्लेख करण्यात आला आहे. बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येत सातत्याने घट होत १९५१ मधील २२% वरून आज ती केवळ ७.९५% पर्यंत आली आहे.
ठरावात म्हटले आहे की, हिंसाचारामुळे बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. धार्मिक असहिष्णुतेच्या आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या या कृत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे आणि जागतिक समुदायाला निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांगलादेशातील हिंदुंनी तीव्र छळाला तोंड देत असूनही न्याय आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संघर्षात उल्लेखनीय लवचिकता दाखवली आहे. त्यांच्या शांततापूर्ण, सामूहिक आणि लोकशाहीयुक्त प्रतिकाराला भारतातील आणि जगभरातील हिंदूंकडून नैतिक आणि मानसिक पाठिंबा मिळाला आहे. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. बांगलादेश सरकारसोबत राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित केला आहे, असेही ठरावात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि जागतिक समुदायाला या अमानवी कृत्यांची गांभीर्याने दखल घेण्याचे आणि हिंदू व इतर अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदुंचे हक्क, प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी संघ आपल्या कटिबद्धतेवर ठाम असून या गंभीर, मानवतेच्या अस्तित्वाच्या संकटाला तोंड देण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती ठरावात करण्यात आली आहे.
या ठरावात पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय शक्ती आणि डीप स्टेट घटकांच्या हस्तक्षेपाचा इशारा देण्यात आला असून सांप्रदायिक तणाव वाढवून आणि अविश्वास वाढवून या प्रदेशाला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये समान सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असून या प्रदेशाच्या एका भागात कोणत्याही प्रकारचा सांप्रदायिक कलह संपूर्ण उपखंडावर परिणाम करतो असे ठरावात अधोरेखित करण्यात आले आहे