उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यात ईद-उल-फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये रस्त्यावर नमाज अदा करणे पूर्णपणे निषिद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुड फ्रायडे आणि ईद-उल-फित्र सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्ह्यातील ६८ ईदगाह आणि १९५ मशिदी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ईदच्या संदर्भात कोणतीही नवीन परंपरा स्वीकारली जाणार नाही, त्याचबरोबर रस्त्यावर नमाज अदा करता येणार नाही. तसेच परंपरेबाहेरील कार्यक्रमांचे आयोजन केल्यास संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल.असे सांगण्यात आले आहे.
या व्यतीरिक्त पोलिस अधिकारी आणि इतर संबधीत अधिकारी आपापल्या भागात अलर्ट राहून कायदा व सुव्यवस्था राखतील. कोणत्याही परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी त्याचे तात्काळ निराकरण करण्यात येईल. तसेच संवेदनशील आणि संमिश्र भागांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. शिवाय समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.