ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबा स्टेडियमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच हे स्टेडियम जमीदोस्त केले जाणार आहे. 2032 च्या ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळांनंतर हे स्टेडियम तोडण्यात येणार आहे. गाबा स्टेडियम पाडल्यानंतर ब्रिस्बेनच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये 63 हजार बैठक व्यवस्था असलेले अत्याधुनिक स्टेडियम बांधले जाणार आहे. हा निर्णय ऑस्ट्रेलियन क्रीडा जगातील एक मोठा निर्णय असणार आहे.
नवीन स्टेडियम 8.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंमतीचे असणार आहे. गाबा स्टेडियमवर अनेक क्रिकेट सामन्यांसह फुटबॉल सामने देखील खेळले गेले आहेत. मात्र, सरकराने घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन स्टेडियमवर चांगल्या सुविधा मिळतील ज्या गाबा स्टेडियमवर मिळत नव्हत्या. आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रिकेट सामने लक्षात घेऊन नवीन स्टेडियमचे डिझाइन केले जाईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड क्रिकेट यांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. यापूर्वी गाबा स्टेडियमची पुनर्बांधणी करण्याची योजना होती परंतु वाढत्या खर्चामुळे ते रद्द करण्यात आले होते. आता हे निश्चित झाले आहे की, नवीन आधुनिक स्टेडियम पूर्णपणे पाडून बांधले जाईल.
गाबा क्रिकेट स्टेडियम हे 1895 मध्ये बांधले गेले होते. सध्या या स्टेडियममध्ये 37,000 प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे.