Jaykumar Gore: सातारा जिलह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरेंवर(Jaykumar Gore) एका महिलेने गंभीर आरोप केल्याने मागील काही वर्षांपासून गोरे सातत्याने चर्चेत येत आहेत. नुकतेच या महिलेला या प्रकरणी खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असून अटक करण्यात आली आहे. मात्र आता या प्रकरणावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी विधानसभेच्या अधिवेशनात आज (दि. २५ मार्च) मोठा गौप्यस्फोट केला.
देवेंद्र फडणवीस आज सभागृहात या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक झाली आहे. यामध्ये स्वत: ती महिला आहे. तुषार खरात नावाचा पत्रकार आणि अनिल सुभेदार नावाचा व्यक्ती आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. याचे सगळे पुरावे सापडले आहेत. याचे व्हॉट्सअॅप संभाषण सापडले आहेत.
पुढे फडणवीस म्हणाले की, आरोपींचे १५० फोन काॅल्स देखील सापडले आहेत. यामध्ये त्यांनी हा कट कसा रचला हे स्पष्ट झाले आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आरोपींच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी गटापर्यंत पोहचत असल्याचा दावा केला आहे.विशेष म्हणजे पत्रकार तुषार खरातने जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
मी जयकुमार गोरेंच्या हिंमतीची दाद देतो. एखादी व्यक्ती अशा स्थितीत गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करते. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार केली, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान हा सगळा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता असे फडणवीसांनी स्पष्ट केले.