पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते रेशीमबागेतील संघ मुख्यालय जाणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी 2014 नंतर एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. मात्र, गुडीपाडव्याचं निमित्त साधून पंतप्रधान तब्बल अकरा वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. यासोबतच पंतप्रधान दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपजूनसाठी पंतप्रधान मोदी नागपूर दौरा करत आहेत. रविवारी 30 मार्च रोजी पंतप्रधानांचे नागपूर शहरात आगमन होईल. त्यानंतर पंतप्रधान रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि तेथून ते माधव नेत्रालय येथे भेट देणार आहेत.
माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपजून कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबागेतील स्मृतिमंदिर येथील डॉ. केशव हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. स्मारक समितीच्या वतीने भैय्याजी जोशी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. संघाचे हे शताब्दी वर्ष असल्याने मोदींची ही भेट फार महत्वाची ठरणार आहे.