Sambhaji Raje : माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis)यांना पत्र लिहिले आहे. त्यावरून राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आता धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. यावर बोलताना हाके म्हणाले की, ओबीसी आणि धनगर समाजाकडून माझी ही विनंती आहे की, संभाजी राजे यांनी किल्ल्याचे संवर्धन केले पाहिजे. मात्र रायगडची नासधूस ते करत आहेत. कुत्र्याचे स्मारक हटवण्यास आमचा विरोध आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजी राजेंची हकलपट्टी व्हावी, अशी मागणी देखील हाके यांनी केली आहे. तसेच वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून संभाजी राजे महाराष्ट्रातले वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोपही हाकेंनी केला आहे.
दरम्यान, वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावरून जे काही सुरू आहे त्याला राजकीय वळण प्राप्त होऊ लागले आहे. वाघ्या कुत्र्याची समाधी हा इतिहास आहे, हे आजचे राजकीय मंडळी कदाचित विसरत चालले आहेत. आजकाल कोणीही सहजपणे इतिहासावर आक्षेप घेतात किंवा दावे काही करतात. परंतु थोर महापुरूषांच्या इतिहासाबद्दल बोलताना याचे राजकीय भांडवल होऊ नये, याचे तरी भान प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे.