अमेरिकेतील लॉस एंजेलिसनंतर दक्षिण कोरियाच्या जंगलात सर्वात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 16 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण या आगीत गंभीर जखमी झाले आहेत. कोरडे हवामान आणि सतत वाहणारे जोरदार वारे यामुळे आग वाढतच चालली आहे. या आगीत १३०० वर्षे जुने बौद्ध मंदिरही जळून खाक झाले आहे. या आगीने आत्तापर्यंत 43,000 एकर पेक्षा जास्त जमीन वेढली आहे.
दक्षिण कोरियाच्या गृह व सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे पाच हजार पेक्षा जास्त लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. या आगीचा सर्वात जास्त परिणाम अँडोंग, उइसोंग, सांचोंग काउंटी, उल्सान या शहरांना झाला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रमाणात पर्यंत सुरु आहेत. मात्र, कोरड्या हवामानामुळे आग विझवण्यास अडथळे निर्माण होत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही आग विझविण्यासाठी 9000 अग्निशामक व 130 हून अधिक हेलिकॉप्टर तैनात आहेत. मात्र, तरीही या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. अशातच आगीच्या संपर्कात आलेल्या शहरातील लोकांना लवकरात लवकर घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण कोरियातील सँचिओंग भागातील जंगलात ही आग लागली. आग हळूहळू आजूबाजूच्या परिसरातही पसरली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तसेच जीवितहानी झाली.
दरम्यान, शुक्रवारी पासून लागलेल्या या आगीत आत्तापर्यंत ४,१५० हेक्टर (१०,२५० एकर) जमीन जळून खाक झाली आहे.