नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन झालेल्या दंगलींच्या तपासादरम्यान अनेक नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. नुकतीच पोलिसांच्या तपासात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. एका यूट्यूबरच्या चुकीमुळे नागपूरमधील परिस्थिती गंभीर झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू झालेला वाद नागपूरमध्ये हिंसाचारापर्यंत पोहचला. पण नागपूरमध्ये परिस्थिती इतकी गंभीर का झाली? अचानक हिंसाचार का सुरु झाला? पोलिसांवर हल्ला का झाला? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.
दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली. नागपूर दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा वाटा होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. एका युट्यूबरने पोलिसांविरूद्ध निराधार बातम्या पसरवून परिस्थिती भडकवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
17 मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा हात होता. या दंगलीत अटक झालेल्यांच्या मोबाइल फोनमधून पोलिसांना महत्त्वाची माहिती आणि पुरावे सापडले. दंगलीच्या दिवशी दुपारपासूनच सोशल मीडियाचा आधार घेत वेगवेगळ्या ग्रुपवर अफवा पसरविणाऱ्यात आल्या. पोलिसांकडून आमच्या मुलांना मारले जात आहे, लवकर या..; अशा प्रकारचे मेसेज पसरवण्यात आले. ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली.
तर अटक करण्यात आलेल्या एका यूट्यूबरने चुकीची माहिती व्हायरल केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मोहम्मद शहजाद खान असे नाव असलेल्या या यूट्यूबरने पोलिसांनीच बॉम्ब फेकल्याची खोटी माहिती व्हायरल केली होती. त्याशिवाय अनेक चुकीची माहिती व्हायरल केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
या खोट्या अफवांमुळे पोलिसांविरुद्ध लोकांच्या मनात तीव्र संताप पसरला आणि दंगलीच्या रात्री पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ले, दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार करण्यात आला.
17 मार्च रोजी नागपुरातील काही भागात संध्याकाळच्या वेळी दंगलीचे वातावरण निर्माण झाले होते. काही दंगखोर शस्त्रे घेऊन रस्त्यावर धावत असल्याचे दिसून आले तर अनेकांनी पोलिस अधिकाऱ्यांवर देखील हल्ला केला. या दंगलीत एकूण ३४ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. याची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेतली होती. आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचं देखील सांगितलं होत.