Anna Bansode: विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याने या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीन नावे जास्त चर्चेत होती. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे, लातूरचे आमदार संजय बनसोडे, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावे विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी आघाडीवर होती. परंतु आज (२६ मार्च) रोजी अण्णा बनसोडेंची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बनसोडे सोडून इतरांची नावे चर्चेत असली तरी विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी केवळ महायुतीच्यावतीने बनसोडे यांचा अर्ज आला होता. त्यामुळे बनसोडे यांची बिनविरोधी निवड झाली. २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीवेळी अण्णा बनसोडे अजित दादांसोबत होते. तसेच जेव्हा अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाले, तेव्हाही अण्णा बनसोडे अजित दादांच्या पाठीशी ठाम उभा राहिले. एकंदरित अण्णा बनसोडे हे कट्टर अजित दादा समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच पिंपरीचे शिलेदार म्हणूनही अण्णा बनसोडेंची ओळख आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल असा त्यांना विश्वास होता. परंतु मंत्रीपद न मिळाल्याने ते निराश झाले होते. नागपूरमध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा ते अधिवेशन सोडून मतदारसंघात निघून आले होते. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन अजित पवार यांनी बनसोडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण उपाध्यक्ष पद हे मंत्री दर्जाचे पद असल्याने अप्रत्यक्षपणे मंत्री दर्जाचे पद अण्णा बनसोडेंना देण्यात आले आहे.
दरम्यान, अण्णा बनसोडे २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र २०१९ मध्ये पुन्हा ते विजयी झाले आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा दणदणीत विजय झाला. अशा प्रकारे त्यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी बनसोडे चिंचवड येथे पान टपरी चालवत होते. आता त्यांच्या रूपाने पिंपरी चिंचवडला पहिल्यांदाच विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाले आहे.