छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा टाकला आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ६ हजार कोटी रुपयांच्या चौकशीसाठी सीबीआयचे पथक रायपूर आणि भिलाई येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआय पथकांनी बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानावर तसेच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या निवासस्थानावर देखील छापे टाकले आहेत.
सीबीआयच्या छाप्याबाबत भूपेश बघेल यांच्या कार्यालयांकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली. सोशल मीडिया साईट ‘X’ वर पोस्ट करत लिहिले की, ‘८ आणि ९ एप्रिल रोजी अहमदाबायेथे होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीसाठी स्थापन केलेल्या मसुदा समितीच्या बैठकीसाठी भूपेश बघेल आज दिल्लीला जाणार आहेत. त्यापूर्वीच सीबीआयचे अधिकारी त्यांच्या रायपूर आणि भिलाई येथील निवासस्थानी पोहोचले.’ अशी माहिती देण्यात आली.
यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने 10 मार्च रोजी जिल्ह्यातील 14 ठिकाणी छापा टाकला होता, भूपेश बघेल आणि त्यांचा मुलगा चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानावर देखील छापे टाकण्यात आले होते. एका कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने १० मार्च रोजी छापेमारी केल्यानंतर काही दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले.