Sanjay Kokate: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटातील अनेक नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत संजय कोकाटे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र शरद पवारांच्या पक्षाकडून पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे कोकोटे नाराज होते. आज (दि. २७ मार्च) कोकाटे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माढ्यामध्ये कोकाटेंचे लाखो समर्थक असल्याने आता माढ्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
संजय कोकाटे यांनी दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या साहाय्याने राजकारणात आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता अणि पुन्हा ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आले होते. आता पुन्हा त्यांनी धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांचे भाकरीचे समीकरण फेल ठरले. पराभवानंतर अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे. यामध्ये शरद पवारांचे वाढते वय हा त्यांच्या पक्षासाठी सर्वात मोठी नाउमेदीची बाब ठरत आहे. कारण या नेत्यांसमोर साहजिकच हा प्रश्न आहे की, शरद पवार यांच्यानंतर काय. कारण अजूनही शरद पवार गटाकडून अशा नेत्याचे नाव समोर आणले जात नाही, जो शरद पवारांनंतरही पक्षाला जोडून ठेवेन आणि पक्षविस्तार करेल. त्यामुळे अर्थातच आपल्या राजकीय भविष्याचा विचार करता आणि आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आहेत ते कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी शरद पवार गटातून बाहेर पडत आहेत. कारण शेवटी हे राजकारणच, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोणीही कुठेही जाऊ शकते.