भाजपवाले दुर्गंध पसंत करतात, म्हणून गौशाळा बांधतात, पण आम्हाला सुगंध आवडतो आणि म्हणून आम्ही परफ्यूम पार्क बनवतो, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा मनाला येईल तसं बोलत आपल्या नेहमीच्या समाजवादी स्टाईल मध्ये बरळले आहेत.
यादव यांचं हे वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. उत्तर प्रदेशातल्या कन्नौज येथे बोलताना त्यांनी ही वक्तव्य केलं.
तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले की, “आम्ही समाजवादी विकास आणि समृद्धीची अपेक्षा करतो. मात्र भाजपची ही दुर्गंधीयुक्त नफरत आहे. कन्नौजचे लोक, जे आपल्या सुगंधासाठी ओळखले जातात, त्यांनी ही दुर्गंध दूर करायला हवी.
दरम्यान, अखिलेश यांच्या या वक्तव्यावर सगळीकडून जोरदार टीका होताना दिसते आहे.
अखिलेश यांच्या या टीकेला उत्तर देताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, “सपा आणि अखिलेश यादव हिंदू श्रद्धेचा अपमान करत आहेत. गाय आणि गौशाळा दुर्गंध पसरवतात, असं ते म्हणत आहेत. श्रीकृष्णांना गोपाल म्हणतात, ज्यांना गायींची सुरक्षा आणि काळजी घेण्याचं दैवी प्रेम होतं. वोट बँकेच हे राजकारण किती लज्जास्पद आहे. लोकं मतांसाठी किती खाली पडू शकतात.’ असं शहजाद पूनावाला म्हणाले आहेत.
तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनीही अखिलेश यादव यांच्यावर टिका करत साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचे एक वाक्य उदाहरणदाखल सांगितले आहे. ते म्हणतात की, ज्यावेळी एखादा शेतकऱ्याच्या किंवा गवळ्याच्या मुलाला गायीच्या गोठ्यातून दुर्गंध यायला लागतो, तेव्हा समजायचे की तो आपल्या पूर्वजांना आणि जमिनीला विसरलाय. तसेच जेव्हा शेतकरी पुत्र जमिनीला विसरतो, तेव्हा समजायचे दुष्काळ पडणार. आता अखिलेश यादव यांना गाईच्या गोठ्यातून दुर्गंध यायला लागलाय, याचा अर्थ समाजवादी पार्टी अंताकडे निघाली आहे हे समजून चालायला हरकत नाही असा टोला हाणला आहे.