Swargate Rape Case: स्वारगेट एसटी स्थानकाच्या परिसरात २५ फेब्रुवारी रोजी एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरून उठले होते. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यातच 26 मार्च रोजी, दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीत ८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहेत.
विशेष म्हणजे आता पीडित तरुणीने पत्राद्वारे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिला आलेल्या अडचणींविषयीची माहिती दिली आहे. पत्रामध्ये वैद्यकिय चाचणीबद्दल बोलताना तिने म्हटले आहे की, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली. तसेच पोलिस चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करावे लागले.
पीडितेने तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून तिला वकिल द्यायचा उशीर झाल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच मला वकील निवडण्याचा अधिकार नाही का?, असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दरम्यान पिडितेने पत्रात घटनेचाही उल्लेख केला आहे. दत्ता गाडेने दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या जोरदार प्रतिकारामुळे तो पळून गेला, असेही तिने नमूद केले आहे. तसेच यादरम्यान ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणे तिला अधिक महत्त्वाचे वाटले असल्याचेही तिने पत्रात म्हटले आहे.