गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. यादरम्यान, मात्र सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर सलमानने यावर मौन तोडले आहे.
सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच मुंबईत या चित्रपटसंबंधित एक पत्रकार परिषद पार पडली. ज्यात सलमान खानला बरेच प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सलमानला जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल देखील विचारण्यात आले. या धमक्यांची भीती वाटते का? असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “सगळं देव, अल्लाह यांच्यावर आहे. जेवढं आयुष्य जगणं नशिबात असेल तेवढं असेल.’ अशी प्रतिकिया सलमानने यावेळी दिली आहे.
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप झाला होता. मात्र, सलमान खानने या गोष्टीला नकार दिला होता. बिश्नोई समाजात काळवीटला महत्व असल्याने सलमानने या प्रकरणी माफी मागावी अन्यथा त्याला जीव गमवावा लागले अशी धमकी त्याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली आहे.
दरम्यान, सलमान खानला येत्या दिवसात अशा धमक्या मिळत आहेत. याचपार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.