पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी (27 मार्च) लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. त्यांच्या भाषणादरम्यान, काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. तसेच ममता बॅनर्जी यांच्या समोर अनेक मुद्दे उपस्थित करत आरजी कॉलेज प्रकरणासंबंधित देखील तिखट प्रश्नांचा मारा केला.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात सामाजिक मुद्द्यांवर बोलण्यासाठी बोलवण्यात आलं होत. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पुढे त्यांनी गुंतवणूक या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली तेव्हा उपस्थित काही जणांनी घोषणाबाजी सुरु करत बॅनरबाजी केली.
https://twitter.com/AITCofficial/status/1905332134539395207
राज्यातील निवडणुका आणि हिंसाचार तसेच आरजी कर कॉलेजमधील मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ममता यांनी ‘आपण माझे स्वागत करत आहात, धन्यवाद. मी आपल्याला मिठाई देईन.’ असं म्हणत मोजक्या शब्दात निदर्शकांना उत्तर दिलं.
यावेळी प्रदर्शनकर्त्यांना ममता म्हणाल्या, “माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका. मी देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे. आपल्या देशाचा अपमान करू नका.” यानंतर, कार्यक्रम आयोजकांनी दंगा करणाऱ्यांना बाहेर करत कार्यक्रम पुढे चालू ठेवला.
दरम्यान, या सगळ्या गोधळानंतर तृणमूल काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट करत ‘दीदींना काहीही फरक पडत नाही. त्या झुकत नाहीत. त्या डगमगत नाहीत, आपण त्यांना जेवढे अधिक टोकाल, त्या तेवढीच भयंकर गर्जना करतील. ममता बॅनर्जी एक रॉयल बंगाल टायगर आहेत.’ अशी पोस्ट सोशल मीडियावर केली.