स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत अडकला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने तो वादात अडकला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. अशातच आता कामराने आपल्या अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कथित वादग्रस्त गाणं तयार केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी कामराला चौकशीसाठी समन्स बजावले होते. पोलिसांच्या समन्सला उत्तर देताना कामराने एक आठवड्याचा वेळ मागितला होता. याचदरम्यान, आता कामराने अटकपूर्व जामिनासाठी न्ययालयात धाव घेतली आहे.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना कुणाल कामराने माहिती दिली की, ‘मुंबईत आल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे.’
दरम्यान, सोमवारी कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. मात्र, कुणालने माफी मागण्यास नकार दिला आहे. अशातच आता मद्रास न्यायालयाकडून कामराला अटकपूर्व जामीन मिळतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.