नागपूर हिंसाचार प्रकरणातील कारवाई अद्याप सुरु असून पोलिसांनी आतापर्यंत १२५ हून अधिक आरोपींना अटक केली आहे. आता या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आज आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मागील दहा दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फैजान खतीब आहे.
17 मार्च रोजी नागपूरच्या महाल भागात दंगल घडवण्यासाठी लोकांना चिथावल्याचा आरोप फैजानवर आहे. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. परंतु फैजान हा चकवा देऊन फरार झाला होता. अखेर तो जाळ्यात अडकला. विशेष म्हणजे तो त्याच्या घरातच लपून बसलेला होता.
फहीम खान या प्रमुख म्होरक्याला यापूर्वीच अटक झालेली होती. त्यानंतर दहा दिवसांपासून फरार असलेला फैजान हा एका कट्टरपंथी इस्लामिक संघटनेचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय होता. बुधवारी पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली. पोलिसांनी शाहबाज काझी नावाच्या आणखी एका संशयितालाही अटक केली आहे.
यातील आरोपी फैजान खतीब अकोल्यात राहतो, पण तो ईदसाठी एक महिन्यापूर्वी नागपूरमधील त्याच्या मूळ गावी आला होता. पण आता दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फैजान खतीबची अटक ही या संपूर्ण प्रकरणात तिसरी मोठी अटक मानली जात आहे.