छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी याठिकाणी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या कारवाईत नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठा देखील जमा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून, मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चकमकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये याठिकाणी अजूनही संघर्ष सुरु आहे. ही चकमक केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. ज्यात १६ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.
15 Naxals killed in an encounter with security forces in the forest of Upampalli Kerlapal area at the Sukma-Dantewada Border. Exchange of fire is still underway: SP Sukma, Kiran Chavan pic.twitter.com/yR7ZJqUGzu
— ANI (@ANI) March 29, 2025
शुक्रवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे सुकमा जिल्ह्यातील डीआरजी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक नक्षलविरोधी शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूने घेरले होते. यामुळे नक्षलवाद्यांना येथून पळून जाता आले नाही. अशास्थितीत नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला, प्रत्युत्तरात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे.