शुक्रवारी प्रकाशित झालेल्या एका यादीत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 100 महान व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहेत, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर आहेत. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या स्थानी आहेत, खरतर या यादीत गेल्यावर्षीच्या स्थितीत काहीही बदल झालेला नाही. यंदाच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 50 व्या स्थानावरून थेट 13 व्या स्थानी झेप घेतले आहेत.
तर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवव्या स्थानी दिसत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना 77 व्या स्थानी ठेवले गेले आहे. याउलट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार 57 व्या स्थानी आहेत. तर मातोश्रीच्या ठाकरेंना मागे टाकून स्वतःचा राजकीय मार्ग तयार करत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 51 व्या स्थानी दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन केला, पण त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांत त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळवून दिला. महायुतीने 235 जागांचे अतिप्रचंड बहुमत मिळवले, ज्यात भाजपाचे 135 आमदार आहेत. त्यांच्या नेतृत्वातील महायुतीने महाराष्ट्रात मोठी परदेशी गुंतवणूक आणली आहे आणि राज्याला एक ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुका हे फडणवीसांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकतात.
गेल्या वर्षी अरविंद केजरीवाल यांना देशातील 18 व्या महत्वाच्या नेत्यांमध्ये स्थान मिळाले होते. त्यावेळी त्यांचा आम आदमी पार्टी मोदींना आव्हान देईल असे मानले जात होते, परंतु दिल्लीतील पराभव आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केजरीवाल यांची रँकिंग 52 व्या स्थानावर घसरली आहे.
यंदाच्या यादीत चंद्रबाबू नायडू यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ते 14 व्या स्थानी दिसत आहेत. आंध्रप्रदेशला 2047 पर्यंत सुवर्णाध्र बनवण्याची योजना तयार करत असताना, चंद्रबाबू यांनी वायएसआरसीपीला हरवून भाजपा व जनसेवा पक्षाच्या युतीत सामील होऊन आंध्रात विजय मिळवला.ज्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे.