पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विदेश दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विजयाचा दावा यादरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बॉलीवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी 2026 च्या निवडणुकीत भाजप सत्तेवर आला नाही तर बंगालमध्ये एकही हिंदू उरणार नाही, असे म्हटले आहे. भाजपच्या एका कार्यक्रमात मिथुन चक्रवर्ती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, भाजपने निवडणुका जिंकल्या नाहीत तर पश्चिम बंगालमधील हिंदू बंगालींचे अस्तित्व धोक्यात येईल. चक्रवर्ती यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत दिल्लीत कमळ फुलले आहे, आता बंगालची पाळी आहे असे म्हटले होते.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपला जिंकावेच लागेल. शेजारील देशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करताना त्यांनी बांगलादेशात जे घडले त्यातून आपण धडा घेतला पाहिजे याकडे लक्ष वेधले.“बांगलादेशमध्ये राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याकांना कसं वागवलं जातंय, याचा ट्रेलर आपण पाहिला आहे. त्यामुळे हिंदूंनी मतदान करण्यावर भर द्यावा”, अशी विनंती चक्रवर्ती यांनी केली. 9 टक्के हिंदू मतदान करत नाहीत. मी तुम्हा सर्वांना ओरडून विनंती करतोय की कृपया मतदान करा.
भाजप जिंकली नाही तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू बंगाली वाचणार नाहीत. भाजप जिंकली नाही तर भाजपला पाठिंबा देणारे हिंदू बंगाली सुरक्षित राहणार नाहीत, कारण ते (विरोधक) तयार आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास आमचा नाश करू, असे ते म्हणत आहेत. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या समर्थकांना कोणत्याही वैयक्तिक विचारसरणी किंवा आवडी-निवडी बाजूला ठेवून भाजप उमेदवाराला विजयी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, सध्या इतर कशाचाही विचार करण्याची गरज नाही. आधी निवडणूक जिंकायची आहे. मला हे किंवा ते आवडत नाही, आपण नंतर पाहू. आधी भाजपच्या उमेदवाराला विजयी करा, पक्षाला विजयी करा. हे आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चक्रवर्ती यांच्या वक्तव्याकडे हिंदू मतांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील विधानसभा निवडणुका ठीक एक वर्षानंतर मार्च-एप्रिल 2026 मध्ये होणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण जागा 294 आहेत. बहुमताचा आकडा 148 आहे. 2021 च्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील TMC ला 215 जागा आणि भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या.