लोकसभेत बोलण्यासाठी त्यांना जो वेळ देण्यात आला होता. तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी लगावला आहे. राहुल गांधींनी आपल्याला सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला प्रत्युतर देत अमित शाह यांनी टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले की, ‘सभागृहात बोलण्याचे काही नियम असतात हे लोकसभेमधील विरोधी पक्षनेत्यांना कदाचित माहिती नसावे. सभागृह मनमानी पद्धतीने चालवता येत नाही. त्यांना अर्थसंकल्पावर चर्चेसाठी ४२ टक्के वेळ देण्यात आली होती. आता कुणी बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जेव्हा संसदेत गंभीर विषयांवर चर्चा सुरू होती, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. तसेच जेव्हा ते माघारी परतले, तेव्हा त्यांनी आपल्या इच्छेनुसार बोलण्याचा हट्ट सुरू केला. संसदेचं कामकाज हे नियम आणि प्रक्रियांनुसार चालतं. सभागृहाच कामकाज एका कुटुंबाकडून चालवण्यात येणाऱ्या काँग्रेस पक्षाप्रमाणे चालत नाही, असा टोला शाह यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, धर्माधारित आरक्षणावरही अमित शाह यांनी काँग्रेसवर टीका केली. धर्माच्या आधारावर कोणतेही आरक्षण हे संविधानाचे उल्लंघन आहे आणि न्यायालये ते रद्द करतील. धर्माच्या आधारावर कोणत्याही आरक्षणाला आम्ही तीव्र विरोध करतो. असं शाह यांनी यावेळी म्हंटल आहे.