Chandrakant Patil: माजी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ल्यावरुन वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना पत्र लिहिले आहे. त्यावरून राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किल्ले रायगडाची पाहाणी केली आहे. दरम्यान दोघांनीही वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही. राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो की, असे वाद उकरून काढू नका, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी संभाजी राजेंना नाव न घेता केले आहे. लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत हे तुम्हाला कळत नाही का, तुमचे कान पितळी झाले आहेत का, असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
यावेळी आशीष शेलार यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी होत असली तरी याबबात चर्चा करू त्यानंतरच सविस्तर अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करू, असे स्पष्ट केले आहे. यावेळी महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमीमंत्री भरत गोगावले हेदेखील उपस्थित होते. दरम्यान रायगडावर ११ आणि १२ एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी रायगडाची पाहणी केली आहे.
दरम्यान,या मुद्द्याबाबत सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागने पुढाकार घ्यावा आणि त्यांनी इतिहास अभ्यासक आणि बाकी काहींना सोबत घेऊन समिती नेमावी. या समितीमध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश करू नये. दोन्ही बाजू समजून घ्याव्या आणि तोडगा काढावा असे मत काही दिवसांपूर्वी आहिल्यादेवी होळकरांचे वशंज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले आहे.