भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, म्यानमारमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यावरून हा भूकंप किती भयानक होता याचा अंदाज लावता येऊ शकतो. हा भूकंप इतका जोरदार होता की त्याचे झटके थायलंडची राजधानी बँकॉकपासून ते भारताच्या मणिपूर आणि मेघालयापर्यंत जाणवले आहेत. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीबाबत म्यानमारकडून माहिती देण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये झालेल्या या भूकंपात आतापर्यंत अधिकृतपणे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २,२०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अजूनही याठिकाणी बचावकार्य सुरु असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूकंपामुळे म्यानमार सरकारने देशाच्या मोठ्या भागात आणीबाणी जाहीर केली आहे.
दरम्यान, म्यानमारवर ओढवलेल्या या कठीण परिस्थिती अनेक देश मदतीचा हात पुढे करत आहेत. भारत यात मागे नसून मदतीचा हात पुढे केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्यानमार आणि थायलंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
भारताकडून शनिवारी “ऑपरेशन ब्रह्मा” अंतर्गत म्यानमारला मदत सामग्री पाठवली आहे. यात तंबू, ब्लँकेट, झोपण्याच्या पिशव्या, अन्नाचे पॅकेट, स्वच्छता किट, जनरेटर आणि औषधांचा या गोष्टी पाठवण्यात आल्या आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मदत यांगून विमानतळावर पोहचवण्यात आली आहे. भारतासह चीन, रशिया, मलेशिया, सिंगापूरसह अनेक देशांनी म्यानमारला मदत पाठवली आहे.
भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होते, जे मोनीवा शहरापासून सुमारे ५० किलोमीट पूर्वेस आहे. आधीच गृहयुद्धाशी झुंजणाऱ्या म्यानमारला या भूकंपामुळे आणखीच झटका बसला आहे. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.