विवादास्पद स्टँडअप कॉमेडियन आणि अलीकडे ‘ठाणे कि रिक्षा’ असे शिर्षक असलेले गीत गाऊन प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलेला कुणाल कामरा याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेतं. ठाणे की रिक्षा हे गाणे देखील कामराने लिहिले आणि सादर केले. या गाण्याचा विवादास्पद आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आणि कामराने जिथं कार्यक्रम केला त्या ठिकाणीं तोडफोड देखील करण्यात आली. आता थेट कुणाल कामराला अटक करण्याची मागणी होत आहे. कामरा हा सध्या तमिळनाडूत असल्याचे प्रथमदर्शनी तरी कळतंय. पण या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात राज्यभरात उमटत आहेत.
कुणाल कामराविरोधात जळगाव आणि नाशिकमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. जळगावच्या महापौरांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर नाशिकमध्ये दोन गु्न्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाने आणि एका उद्योजकाने तक्रार दिली होती. त्यावरून नाशिक पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत, असे खार पोलिसांनी माध्यमांना सांगितले आहे. त्यावरूनच मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराला तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. चौकशी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. असे असले तरी कुणाल कामरा अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही.
मुंबई पोलिसांनी २७ मार्च रोजी तिसरे समन्स बजावले असून, ३१ मार्च रोजी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, तत्पूर्वीच म्हणजे मुंबई पोलिसांचे समन्स मिळताच कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. आपण महाराष्ट्रात जाऊ शकत नाही. कारण तिकडे स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते. त्याचबरोबर मला धमक्या दिल्या जात असून, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मुंबईतील न्यायालयात जाऊ शकत नसल्याचे त्याने याचिकेत म्हटले होते. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. पण आता परिस्थिती मात्र प्रचंड चिघळली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होतं हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.