वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. कारण शेवटी त्याच्याकरिता पैसे होळकरांनी दिलेले आहेत. त्यामुळे तो असा कसा काढून टाकणार ? याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे. इतके वर्ष झाले त्या ठिकाणी तो वाघ्याच्या पुतळा किंवा समाधी आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं काही आहे का? असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सध्या राज्याच्या राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक देखील सध्या चर्चेत आले आहे. छत्रपती घराण्याचे वंशज आणि कोल्हापूर गादीचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला ३१ मे पर्यंतची मुदत देखील दिली आहे.
यादरम्यान या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते पुढे म्हणाले की उगाचच वाद करण्याचं काही कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं अयोग्य आहे, बसून मार्ग काढला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ मिळत नाही, असे म्हटले होते. यावर देखील मुख्यमंत्री म्हणाले की “मी त्यांना अनेक वेळा वेळ दिलेली आहे. पण त्यांना असं का वाटतं माहिती नाही. मी दरवेळेस त्यांना वेळ देतो. ते माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं काही कारणच नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.