आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा मोठा अपघात झाला ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे यांच्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
कोण होते सुधाकर पठारे?
सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे येथील होते. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अॅग्री, एलएलबी झाले आहे.
स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.