काल गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील ताज्या मुद्दयांवर देखील भाष्य केलं आहे. ज्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन करत, ‘राज्यात सध्या जुने मुद्दे उकरून काढून लोकांना भरकटवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या बहुमताने या सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे. त्यांनी राज्य चांगलं चालवावं. आम्हाला विश्वासात घेऊन राज्य चालवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल,’ असं म्हंटले आहे.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हंटल आहे की, ‘राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी काल राज ठाकरेंचं भाषण संपूर्ण ऐकू शकलो नाही. मात्र मी जेवढं भाषण ऐकलं त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. या मुद्द्यांवर आम्ही निश्चितपणे विचार करू,” असं दवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे. ते आज नागपूरात बोलत होते.