भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे. सत्तेच्या लालसेपोटी ममता बॅनर्जींनी अगणित जीव गमावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ईदच्या मुहूर्तावर ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर मालवीय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममतांच्या “मी सर्व धर्मांसाठी आपला जीव देण्यास तयार आहे.” या वक्तव्यावर निशाणा साधत मालवीय म्हणाले की, ‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्तेच्या लालसेपोटी अगणित जीव गमावले आहेत. त्यांच्या सत्ताकाळात अनेक हिंदुविरोधी दंगली घडवून आणण्यात आल्या. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. राजकीय दबाव आणण्यासाठी बलात्काराचा वापर केला गेला आणि भ्रष्टाचार आणि खंडणीमुळे अगणित जीवन उद्ध्वस्त झाले. आर.जी. कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना याचा पुरावा आहे. असे आरोप मालवीय यांनी केले आहेत.
पुढे ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी यांचे देशासाठी प्राण अर्पण करण्याचे विधान पोकळ आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रथम पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेची खात्री करावी आणि हिंदू धार्मिक सणांना लक्ष्य करणे थांबवावे. बॅनर्जींनी बंगालचे बांगलादेशात रूपांतर करण्याचे स्वप्न सोडावे, कारण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.’
2026 मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमुळे तृणमूल काँग्रेसचे सरकार संपुष्टात येईल, असा दावा देखील मालवीय यांनी यावेळी केला आहे. 2026 मध्ये बंगालची जनता जुलमी शासनाविरुद्ध आवाज उठवेल व त्यांचे डगमगणारे सरकार उलथून लावेल. असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
ईदनिमित्त कोलकात्याच्या रेड रोडवर एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित असल्याचे म्हटले होते. ज्यावर मालवीय यांनी प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत.