उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील १५ ठिकाणांचे नाव बदलण्याची योजना जाहीर केली आहे. यामध्ये हरिद्वार, डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंग नगर. या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली असून धामी सरकारने या बदलांसाठी जनभावना, भारतीय संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा यासारख्या कारणांचा उल्लेख केला. नामांतरित ठिकाणांमध्ये शिवाजी नगर आणि ज्योतिबा फुले नगरचाही समावेश आहे. म्हणजेच या निर्णयानंतर औरंगजेबपूर हे शहर शिवाजी नगर या नव्या नावाने ओळखले जाईल, गजिवली हे आर्य नगर होईल तर चांदपूर शहर ज्योतिबा फुले नगर होईल.
“उत्तराखंड सरकारनं उचललेलं हे पाऊल म्हणजे भारतीय संस्कृतीचं संवर्धन करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यातून जनतेला प्रेरणा मिळावी यासाठी घेतलेला निर्णय आहे” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे. या निर्णयानुसार ठिकाणांची नावं बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. नावं बदलल्यानंतर सर्व शासकीय कामकाजासंदर्भातील कादगपत्रांमध्ये या ठिकाणांचा उल्लेख बदललेल्या नावांनिशीच केला जाईल, अशी माहिती उत्तराखंड सरकारकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. “भारतीय जनता पक्ष या निर्णयाचं स्वागत करतो. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान दिलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करून त्यातून लोकांना प्रेरणा देण्याचे काम एकीकडे या निर्णयामुळे होत आहे. तर दुसरीकडे परकीय आक्रमकांनी केलेल्या अन्यायाचीही जाणीव लोकांना यातून होईल” अशी प्रतिक्रिया भाजपाचे माध्यम प्रमुख मानवीर चौहान यांनी दिली.
बहुतांश भाजपशासित राज्यात शहराची जुनी नावे बदलून नवी नावे ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात देखील महायुती सरकारने इस्लामिक शासकांचे नाव असलेल्या शहरांची नावे बदलुन त्या शहराला भारतीय संस्कृतीशी सुसंगत असलेली नावे दिली आहेत. यामध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर केले, तर उस्मानाबाद चे नाव बदलून धाराशिव करण्यात आले आहे.