महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरून वाद शांत होतोय असे वाटत असतानाच पुन्हा एकदा गुढीपाडवा व रमजान ईदच्या दिवशी काही समाजकंटकांनी बीड,आणि जालना जिल्ह्यातील प्रार्थनास्थळांची विटंबना करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगरमध्येही दोन गटात हाणामारी झाली. मात्र स्थानिकांनी समजूतदारपणा दाखवल्याने वाद वेळीच मिटला.
तिकडे बीड जिल्ह्यात सोमवारी ईदच्या दिवशी अशीच एक धक्कादायक घटना घडली. येथे एका गावात मंदिराची विटंबना करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्थी करत दोन वेगवेगळ्या समाजातील स्थानिक रहिवाशांशी चर्चा केली. यानंतर गावातील परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे. बीडमधील पाचेगाव येथे रविवारी गुढीपाडव्यानिमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. येथील कानिफनाथ मंदिरापासून वार्षिक मिरवणूकही काढण्यात आली. यानंतर सोमवारी ईदनिमित्त काही लोकांनी मंदिरावर भगव्या ध्वजासह हिरवा झेंडाही लावला. मंदिरावर हिरवा झेंडा फडकवल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस गावातील दोन वेगवेगळ्या समुदायांच्या सदस्यांशी बोलले आणि दोन्ही ध्वज मंदिरातून हटवण्यात आले. या घटनेबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तिकडे मुंबईतील मालाड मध्येही गुढीपाडव्यानिमित्त दोन समाजातील गटांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड (पश्चिम) मधील कुरार येथील पठाणवाडी परिसरात रविवारी सायंकाळी गुढीपाडव्यानिमित्त यात्रा सुरू होती. तेव्हा एका ऑटोरिक्षातील दोन जण भगवा झेंडा घेऊन मशिदीजवळून जात होते. गैरसमजातून काही लोकांनी दोघांनाही मारहाण केल्याने दोन्ही गटात हाणामारी होऊन परिसरात तणावाचे वातावरण पसरले. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या घटनेच्या एक दिवस आधी याच बीड मधील मशीदीवर स्फोट झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यातही घेतल होते. पण आता ऐन बकरी ईदच्या दिवशी काही कट्टर पंथीयानी मंदिरांवर हिरवा झेंडा फडकवल्याने यावरून वाद निर्माण झाला आहे.