बहुचर्चीत वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज, बुधवारी (दि. ३) प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता लोकसभेत मांडले जाणार आहे यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आहे या मुद्यावरून सभागृहात मंगळवारी प्रचंड गोंधळ झाल्याने शून्य प्रहराचे कामकाज ठप्प पडले. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.
लोकसभेत विधेयक सादर करण्याचा निर्णय व्यवसाय सल्लागार समितीच्या (बीएसी) बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्यासह विरोधी सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सभागृहातील शून्य प्रहरात या असंतोषाचे पडसाद उमटले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वक्फ विधेयकाच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि अखेर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आज लोकसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. सभापती बिर्ला यांनी सांगितले की, विधेयकावर दुपारी १२ वाजता किमान आठ तास चर्चा होईल. तथापि, विरोधकांनी या विषयावर बारा तासांची चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.
‘बीएसी’च्या बैठकीत मी समितीसमोर प्रस्ताव मांडला होता की उद्या २ एप्रिल रोजी आपण वक्फ दुरुस्ती विधेयक आणत आहोत आणि त्यासाठी आपल्याला चर्चेसाठी वेळ द्यावा लागेल. या विधेयकावर चर्चेसाठी एकूण आठ तासांचा वेळ दिला जाईल यावर एकमत झाले. हा वेळ सभागृहाचे मत घेतल्यानंतर वाढवता येईल, असे रिजिजू यांनी सांगितले. ‘हे विधेयक गरीब मुस्लिम, मुले आणि महिलांच्या हिताचे आहे. वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन पारदर्शक पद्धतीने केले पाहिजे. या विधेयकाला विरोध करणारे काही मूठभर शक्तिशाली लोक आहेत. त्यांनी वक्फ मालमत्तांवर अतिक्रमण केले आहे, असे ते म्हणाले
सरकारने त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली नाही, असा दावा करत विरोधी सदस्यांनी बीएसीच्या बैठकीतून सभात्याग केला. बाहेर पडल्यावर त्यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रश्न केला की, “वक्फ बोर्डांच्या रचनेत सुधारणा करणे आवश्यक आहे हे सांगताना ते म्हणाले की, या वक्फ संस्थांनी मुस्लिमांना कोणते ठोस फायदे दिले आहेत?” “प्रत्येक सकारात्मक उपक्रमाला विरोध होतो. वक्फ बोर्डामुळे मुस्लिमांना खरोखरच फायदा झाला आहे का? त्याऐवजी, ते काही निवडक लोकांच्या वैयक्तिक अजेंडाचे व्यासपीठ बनले आहेत तसेच सरकारी मालमत्ता बेकायदेशीरपणे जप्त करण्याचे साधन बनले आहे असे योगी यांनी म्हंटले आहे.
इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी मंगळवारी संध्याकाळी दीड तास बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली आहे. भारतीय जनता पक्षासह अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा पक्षादेश (व्हिप) जारी केला आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाला बुधवारी संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळतेवेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा व राज्यसभेतील भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता आहे.तसेच शरद चंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आहे. संसदेच्या समन्वय सभागृहात झालेल्या या बैठकीला राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना उबाठाचे जेपीसी सदस्य अरविंद सावंत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह सप, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आदी पक्षांचे नेते उपस्थित होते.