केंद्र सरकार प्रश्नोत्तराच्या तासानंतर, बुधवार, २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता लोकसभेत बहुचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषणा केली आहे की या विधेयकावर सभागृहात आठ तास चर्चा होईल.
तथापि, विधेयक सादर झाल्यामुळे लोकसभेतील सदस्यांमध्ये तसेच राजस्थानमधील अजमेर दर्ग्याच्या खादिम समुदायात मतभेद निर्माण झाले आहेत. खादिमांचे प्रतिनिधित्व करणारी मुख्य संघटना, ज्याला ‘अंजुमन’ म्हणून ओळखले जाते, तिने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या काही सदस्यांना विरोध दर्शविला आहे आणि त्यांना मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात काम करणारे ‘नॉन-स्टेट अॅक्टर्स’ म्हंटले आहे. विधेयकाचे समर्थन करणाऱ्या खादिम सलमान चिश्ती यांच्या प्रकाशित लेखाबद्दल अंजुमनने त्यांच्यावर टीका केली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या त्यांच्या या लेखात, सलमान चिश्ती यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक विकासाभिमुख असल्याचे म्हणत या विधेयकाचे समर्थन केले आहे त्यानंतर किरेन रिजिजू यांनी चिश्ती यांचा लेख सोशल मीडियावर शेअर केला आणि म्हटले की हे विधेयक आणि त्यानंतरच्या प्रतिक्रिया व्यावहारिक आहेत. यामुळे आता यावर देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
या वादाला उत्तर देताना, अंजुमन संस्थेचे सचिव सरवर चिश्ती यांनी सलमान चिश्ती यांच्या विचारांपासून फारकत घेत असे म्हंटले आहे की,सलमान चिश्ती हे दर्ग्यात सेवा करणाऱ्या ५,००० खादिमांपैकी एक आहे. खादिमांच्या संस्थेने वक्फ दुरुस्ती विधेयकाचा निषेध करत एक प्रस्ताव पारित केला होता. सलमान चिश्ती हे एक खादिम असल्याने ते या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाहीत. त्यांनी खादिमांच्या नावाचा दुरुपयोग केला आहे.”
दरम्यान आज केंद्र सरकार संसदेत वक्फ विधेयक सादर करण्याची तयारी करत असताना, यादरम्यान होणारी चर्चा अधिक तापण्याची शक्यता आहे पण विरोधकांनी कितीही विरोध दर्शवला तरी सरकारकडे बहुमत असल्याने विधेयक मंजूर करण्यास फारशी अडचण येणार नसल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.