Weather Update: उन्हाचा चटका वाढल्याने उष्णता अधिक जाणवत आहे. तर दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. त्यातच हवामान विभागाने आणखी दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याला २ आणि ३ एप्रिल रोजी अवकाळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर २ मार्च रोजी 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
अवकाळी पावसासाठी नागरिकांनी अलर्ट रहावे आणि सज्ज रहावे अशा सूचना नागरिकांना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. शुक्रवारपासून म्हणजेच ४ एप्रिलपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पुणे, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, अमरावती आणि बीड या 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि रब्बी मका पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच फळबागांना देखील या हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.