Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला तसेच बीडमधील स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची भेट घेत संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांनी युवा संवाद मेळाव्यात भाषण करताना तूफान फटकेबाजीही केली.
भाषणादरम्यान त्यांनी भेटायला येताना स्मृतीचिन्हे वगैरे न आणण्याचे आवाहन बीडकरांना केले. याविषयी बोलताना ते म्हणाले की, दौऱ्यादरम्यान आपल्यासाठी काही काही आणू नका, कर्मधर्म सहयोगाने आई वडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने चांगले चाललेय आमचे. काही देऊ नका. माझा नमस्कार घ्या, तुमचाही नमस्कार द्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता त्याचा इतिहास आठवा, मग म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो.
चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला तर, त्यापासून दूर राहा. एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत नेतृत्त्वाला आणि पक्षाला मोजावी लागते तसे होऊ देऊ नका, असे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले. लोक जेवढा मोठा हार आणतात तेवढी भीती वाटते की काहीतरी गौडबंगाल असल्याचे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी बीडकरांसमोर केले.
राख गॅंग, वाळू गॅंग सर्व गॅंग सुता सारख्या सरळ करायच्या आहेत, असेही ते म्हणाले. पैशाचा हिशोब नीट पाहिला पाहिजे, मी पण कोणाच्या पैशात मिंधा राहणार नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी बीडमध्ये काम करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला.