Disha Salian Case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची खाजगी सचिव दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाबाबत दिशाचे वडिल सतिश सालियन यांनी याचिका दाखल केली होती. यावरती आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीला सतिश सालियन स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले होते.
सुनावणी सुरू होताच सालियानचे वकील निलेश ओझा यांनी खंडपीठासमोर एक वेगळा मुद्दा उपस्थित केला. ही याचिका चुकीच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. रोस्टरनुसार महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवरील याचिकांची सुनावणी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर व्हावी, अशी मागणी त्यांनी खंडपीठासमोर केली. त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी सबमिशनचा विचार केला आणि रजिस्ट्री यांना रोस्टरनुसार प्रकरण मांडण्याचे आदेश दिले आहेत.
आता आमच्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते किंवा चीफ जस्टीसकडे ट्रान्सफर होऊ शकते. न्यायालयाने या खटल्याच्या नोंदीला परवानगी दिली आहे. सुनावणीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. न्यायालयाने खूप लांबची तारीख दिली तर आम्ही लवकर सुनावणी व्हावी, यासाठी विनंती करू,अशी प्रतिक्रिया ओझा यांनी दिली आहे.
दरम्यान, दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील राहत्या घराच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. परंतु आता तिच्या वडिलांनी याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.