Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बीड-अहिल्यानगर रोडवरून पवार यांचा ताफा जात असताना विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेत पवारांचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
काही दिवसांपूर्वी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती. फेसबुक पोस्टमध्ये या शिक्षकाने कित्येक वर्ष पगार न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मागील आठवडाभरापासून बीड जिल्हातील विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचे उपोषण सुरू आहे. दरम्यान आज अजित पवारांचा ताफा अडवत या शिक्षकांनी आपल्या मागण्या पवारांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
जोपर्यंत अजित पवार भेट घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून घरी जाणार नाहीत. आम्ही घरदार सोडून येथे आलो आहोत. मरायचे का जगायचे हे अजित दादाच सांगतील. काय होयचे ते होवू द्या. आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका या आंदोलनातील सहभागी महिलांनी आज घेतली होती. आमचा संयम आणि सहनशीलता संपली आहे. आता काहीच होवू शकत नाही. मेल्याशिवाय आम्हाला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मागील २० वर्षे आम्ही बिना पगारी मरत आलो आहेत. त्यामुळे आता मरणाची भीती राहिलेली नाही अशा भावना आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
बीडच्या दौऱ्यावर असलेले अजित पवार आंदोलनस्थळी येतील, उपोषणकर्त्यांची भेट घेतील आणि मागण्या मान्य करतील, असे या शिक्षकांना वाटत होते. मात्र, पवारांनी आंदोलनकर्त्यांना भेट न दिल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.