पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मुंबई न्यायालयाने या प्रकरणी मोठा निर्णय दिला असून, 29 वर्षीय तरुणाला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव कामरान खान असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले, ‘कामरान खानने २०२३ मध्ये पोलिसांना फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मारणार असल्याची धमकी दिली होती. तसेच मुंबईतील जेजे रूग्णालयात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचेही त्याने सांगितले होते. यावेळी त्याने आपण दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे सांगितले होते.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोर्टाने कामरान खानला चांगला धडा शिकवला आहे. न्यायाधीश हेमंत जोशी यांनी याप्रकरणी निकाल देताना म्हंटल आहे की, ‘कामरान खानच्या कृत्यामुळे सरकार आणि मोठ्या नेत्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कामरान खानवर दया दाखवणे योग्य होणार नाही. कामरान खानने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत.
दरम्यान, आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा युक्तिवाद कामरान खानच्या वकिलाने केला. मात्र, याला फेटाळत, आरोपीने मानसिक आरोग्यासंदर्भातील कुठलेही पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
20 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला होता. दाऊद इब्राहिमने आपल्याला पंतप्रधान मोदी आणि आदित्यनाथ योगी यांना मारण्यासाठी ५ कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. आता न्यायालयाने या प्रकरणी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.