BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज थायलंडची राजधानी बँकॉक येथे पोहोचले आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी थायलंडच्या (Thailand) पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. यानंतर पंतप्रधान श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होतील.
BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे की, ‘गेल्या दशकभरात बंगालच्या उपसागरातील प्रादेशिक विकास, कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी BIMSTEC हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मी BIMSTEC देशांच्या नेत्यांची भेट आणि चर्चा करण्यास उत्सुक आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, ‘भारत आणि थायलंड या दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने थायलंडच्या पंतप्रधान पायतोंगटार्न शिनावात्रा यांच्याशी संवाद देखील साधणार आहेत. या भेटीदरम्यान अनेक महत्वांच्या मुद्दयांवर देखील चर्चा केली जाईल. असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
थायलंडहून पंतप्रधान मोदी ४ एप्रिल रोजी श्रीलंकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होतील. श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून अनुरा कुमारा दिसानायके यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. अनुरा कुमारा दिसानायके यांच्या भारत दौऱ्यानंतर आता भारताचे पंतप्रधान आणि त्यांची भेट होत आहे.
BIMSTEC म्हणजे काय?
‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation), ही एक प्रादेशिक संस्था आहे जी बंगालच्या उपसागरातील आणि लगतच्या देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन झाली आहे.
या संस्थेची स्थापना 1997 मध्ये झाली, त्यावेळी याला BIMST-EC असे नाव होते. 2004 मध्ये नेपाळ आणि भूतान यात सामील झाल्यावर त्याचे नाव बदलून ‘BIMSTEC’ असे करण्यात आले.
BIMSTEC संस्थेत बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे.
या संस्थेचे उद्दिष्ट बंगालच्या उपसागराच्या किनारी आणि लगतच्या भागातील देशांमध्ये आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक क्षेत्रात सहकार्य वाढवणे हे आहे.