Solapur Earthquake: गेल्या आठवड्यात थायलंडमध्ये आणि म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाने जग हादरले असताना आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबत अधिकृत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा येथे आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी २. ६ रेक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. परंतु सांगोला हा भूकंपाचा केंद्रबिंदू ठरल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपादरम्यान सांगोल्यातील नागरिक काही काळासाठी घाबरले होते आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली होती. परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही.
या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसली, तरी स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण सोलापूर जिल्ह्यात याआधी अशा स्वरूपाच्या मोठ्या भूकंपाची नोंद नसल्याने ही घटना आश्चर्य व्यक्त करणारी मानली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये आणि थायलंडमध्ये मोठ्या भूकंपाची नोंद झाल्याने त्याचा प्रभाव शेजारील भूभागांवर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. परंतु सध्या प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, पुढील कोणत्याही संभाव्य धोक्याच्या दृष्टीने तयारी ठेवण्यात आली आहे.