मुंबई पोलिसांनी लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून मोठा निर्णय घेतला आहे. उड्डाण करणारे ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनवर एका महिन्यासाठी बंदी घातली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी या संदर्भात माहिती दिली आहे. ही बंदी 4 एप्रिलपासून लागू होणार आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 163 अंतर्गत जारी केलेला प्रतिबंधात्मक आदेश 4 एप्रिल ते 5 मे या कालावधीत लागू राहील. दहशतवादी आणि असामाजिक घटकांपासून लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची भीती आहे. आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. हवेत उडणाऱ्या गॅजेटवरील बंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ‘दहशतवादी आणि समाजकंटक त्यांच्या हल्ल्यांमध्ये ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडरचा वापर करू शकतात आणि व्हीव्हीआयपींना लक्ष्य करू शकतात, ज्यामुळे लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच ते सार्वजनिक मालमत्तेची देखील नासधूस करू शकतात. असेही म्हंटले आहे.
या आदेशात पुढे म्हटले आहे की, ‘हवेत उडणाऱ्या गॅजेटमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी असे निर्बंध घालण्याची गरज आहे. तसेच हवेत उडणाऱ्या गॅजेटना विशेष परवानगीशिवाय परवानगी दिली जाणार नाही. असेही आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत शिक्षा केली जाईल. असं आदेशात सांगण्यात आलं आहे.