वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत सादर करण्यात आले. राज्यसभेत देखील वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. दोन्ही सभागृहांनी हे विधेयक मंजूर केल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी या विधेयकावर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक आणि मुस्लिम वक्फ (रद्द) विधेयक मंजूर करणे हे सामाजिक-आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. हे विशेषतः अशा लोकांना मदत करेल जे दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिले आहेत.
पुढे पंतप्रधानांनी संसदीय आणि समितीच्या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘ज्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आणि हे कायदे मजबूत करण्यात योगदान दिले त्यांचे आभार. संसदीय समितीकडे आपल्या बहुमोल सूचना पाठवणाऱ्या असंख्य लोकांचेही विशेष आभार.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘अनेक दशकांपासून वक्फ व्यवस्थेत पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे. यामुळे विशेषतः मुस्लिम महिला, गरीब मुस्लिम यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले आहे. संसदेने संमत केलेल्या कायद्यांमुळे वक्फ कायद्यात पारदर्शकता वाढेल आणि लोकांच्या हक्कांचेही संरक्षण होईल.
आपण आता एका नवीन युगात प्रवेश करत आहोत, जिथे व्यवस्था अधिक आधुनिक आणि न्याय्य असेल. प्रत्येक नागरिकाला आदर आणि समानता मिळावी हे आपले ध्येय आहे. या मार्गाचे अनुसरण करून आपण एक मजबूत व समावेशक भारत निर्माण करू. असंही ते पुढे म्हणाले.