महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र महाबळेश्वर बाबत मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारला जात असून, हा प्रकल्प महाबळेश्वरच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात याआधी २३५ गावांचा समावेश केला होता. पण आता नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात आणखी २९४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्याला आता राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील ५२९ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.
या प्रकल्पात नवीन गावांचा समावेश करण्यास मान्यता मिळाल्याने साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर म्हणजेच तब्बल २०९७ चौ. किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल. आता एमएसआरडीसीकडून या भागाचा विकास आराखडा बनविण्याचे काम केले जाणार आहे.
दरम्यान, लवकरच हा प्रकल्प सुरु केला जाणार असून, आता या प्रकल्पामुळे या भागातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. ज्यामुळे या गावांचा विकास होईल.