बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी, मोहम्मद युनूस यांना भेटले आहेत. दोन्ही नेत्यांची ही भेट थायलंड मध्ये झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या थायलंड दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान BIMSTEC परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. या परिषदेत सामील होण्यासाठी मोहम्मद युनूस देखील येथे आले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉक येथे ही परिषद आयोजित करण्यात आली जिथे दोन्ही नेत्यांची भेट झाली.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्यानंतर बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत भारताची ही पहिलीच उच्चस्तरीय बैठक होती, दोन्ही नेत्यांमधली ही बैठक ४० मिनिटे चालली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
Watch: Visuals of PM Modi, Bangladesh's Yunus meeting in Bangkok https://t.co/3ULZjYesGg pic.twitter.com/eozZCfrO6n
— Sidhant Sibal (@sidhant) April 4, 2025
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोठ्या निदर्शनांनंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले होते. बांगलादेश सोडल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. दरम्यान, युनूस यांनी भारताला हसीना यांच्या चौकशी साठी त्यांचे प्रत्यार्पण करावे अशी मागणी करणारे औपचारिक पत्र पाठवले होते, परंतु नवी दिल्लीकडून त्यांना कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दोन्ही देशांमध्ये मतभेत निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली आहे.