पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी संध्याकाळी ते कोलंबो येथे पोहचले आहेत. यावेळी श्रीलंकेच्या परराष्ट्रीय मंत्री विजिता हेराथ, यांनी इतर सहकारी मंत्र्यांच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत केले. शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदी श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. येथे त्यांचे रेड कार्पेटवर तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले. याआधी मोदी थायलंड दौऱ्यावर होते पण तो दौरा आटोपून ते काल रात्री श्रीलंकेत पोहोचले. आज, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान मोदी श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसुर्या यांचीही भेट घेतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “कोलंबोमध्ये पोहचलो असून एअरपोर्टवर माझे स्वागत करणाऱ्या सर्व मंत्रीगण व्यक्तीचा आभारी आहे.श्रीलंका मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहे. असे ट्वीट करत माहिती दिली आहे.
या विषयावर होईल चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका भेटीदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण, ऊर्जा, डिजिटल पायाभूत सुविधा, आरोग्य आणि व्यापार यासह अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे.समोर आलेल्या माहितीनुसार मोदी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटीत तमिळ समुदायाला अधिक अधिकार देण्याची मागणी करू शकतात. या काळात, श्रीलंकेत राहणाऱ्या मच्छीमार आणि तमिळ नागरिकांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा होऊ शकते.
पंतप्रधान मोदींचा हा श्रीलंकेचा तिसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी २०१५ आणि २०१९ मध्ये श्रीलंकेला भेट दिली होती.या विषयावर भारत श्रीलंका यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत करणे हा देखील या दौऱ्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे दोघेही संरक्षण तसेच आर्थिक बाबींवर चर्चा करतील. तसेच, गेल्या वर्षी झालेल्या द्विपक्षीय कराराला अंतिम स्वरूप दिले जाईल.
आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या दौऱ्यादरम्यान, कच्चथिवू बेटाच्या वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. हे बेट अनेक वर्षांपासून भारत आणि श्रीलंकेमध्ये वादाचा मुद्दा राहिला आहे. वस्तुतः हे बेट एकेकाळी भारताच्या नियंत्रणाखाली होते, परंतु भारत सरकारने कधीही अधिकृतपणे त्यावर राज्य केले नाही. १९७४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला ते भेट दिले होते.अलिकडेच, तामिळनाडू विधानसभेने श्रीलंकेकडून बेट परत मिळवण्याच्या बाजूने एक ठराव मंजूर केला. त्यामुळे या संदर्भात, पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्यातील भेटीदरम्यान या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.