महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्यातील अनेक राजकीय आणि धार्मिक संघटना खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत. औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्रात नकोच, अशा शब्दात अनेकांनी निषेध दर्शवला आहे.
याचदरम्यान राज्याचे समाजकल्याणमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठी घोषणा केली आहे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटला असताना मंत्री शिरसाट यांनी केलेली ही मोठी घोषणा आहे. औरंगजेबची कबर असलेल्या खुलताबाद शहराचे नाव बदलण्यासोबतच दौलताबादचेही नामांतर होणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी संगीतले की, ‘औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नाव बदलून रत्नापुर असे करण्यात येणार आहे. पूर्वी या शहराचे नाव रत्नापूरच होते जे औरंगजेबाने बदलून खुलताबाद असे केले. तर दौलताबादचे नाव पूर्वी देवगिरी असे होते. जे नंतर दौलतापूर करण्यात आले.’ आता या दोन्ही ठिकाणांची नावे बदलणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
दरम्यान, शिरसाट यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंचे स्मारक याठिकाणी बांधणार असल्याचंही म्हंटल आहे.