पुण्यातील प्रसिद्ध ट्रम्प टॉवर प्रकल्पानंतर आणखी एक ट्रम्प प्रकल्प पुण्यात बांधण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प ऑर्गनायझेशन भारतातील व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये आपल्याला अनेक ट्रम्प टॉवर पाहायला मिळतात. अशातच आता ट्रम्प ऑर्गनायझेशन पुण्यात आणखी एक मोठा प्रकल्प आणत आहे.
भारतातील ट्रम्प ऑर्गनायझेशनची रिअल इस्टेट भागीदार असलेल्या ट्रिबेका डेव्हलपर्सने देशातील पहिला ट्रम्प-ब्रँडेड ऑफिस प्रकल्प पुण्यात सुरू केला आहे. पुण्यातील ट्रम्प वर्ल्ड सेंटर हा १.६ दशलक्ष चौरस फूट ऑफिस प्रकल्प असून यामध्ये १,७०० कोटी रुपये गुंतवणुकीचा समावेश आहे. २,५०० कोटी रुपयांच्या विक्री क्षमतेचा हा प्रकल्प ट्रिबेका डेव्हलपर्स कुंदन स्पेसेसच्या भागीदारीत विकसित करेल.
गेल्या दशकात, भारत ट्रम्प-ब्रँडेड रिअल इस्टेटसाठी सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. जागतिक आणि स्थानिक आयटी कंपन्यांचे केंद्र बनलेल्या शहरातील उच्च दर्जाच्या कार्यालयीन जागांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातील नवीन व्यावसायिक प्रकल्पाची योजना आहे. ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांच्या मते, हा प्रकल्प सुमारे चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.