दरवर्षी देशभरात श्रीराम नवमी मोठ्या प्रमाणात साजरी होते याही वर्षी रविवार दिनांक ६ रोजी देशासह महाराष्ट्रात हा भव्य उत्सव दणक्यात साजरा होणार आहे. त्यासाठी प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडी पहाता आणि कट्टर पंथीयांकडून हिंदू सणांमध्ये धुडगूस घालण्याचे प्रकार पाहता राज्यात रामनवमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठमोठ्या शोभा यात्रा निघतात. नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातूनही अशीच शोभायात्रा निघते. मात्र काही दिवसांपूर्वी नागपुरात महाल आणि जवळपासच्या परिसरात जोरदार हिंसाचार (Nagpur Violance) झाला होता. या हिंसाचारातील प्रमुख मास्टरमाइंड फहीम खान याच्यासह इतरही संबंधीत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातूनच शोभायात्रा मार्गक्रमण करते. त्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रेच्या मार्गसंदर्भात अनेक प्रश्नचिन्ह होते. आयोजकांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन यात्रेचे शांततेने आयोजन संदर्भात नियोजन केले आहे. शोभायात्रेचा मार्ग नेहमीसारखाच राहील, असेही जाहीर केले आहे. शिवाय त्या संदर्भात चोख पोलीस बंदोबस्त केल्याचा आयोजकांचा विश्वास आहे. पण मागच्या काही दिवसांपासून राज्यात काही लोकांकडून सातत्याने कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण केले जात असल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडवा सणाच्या दिवशी मुंबईतील मालाड मध्ये दोन समाजातील गटांमध्ये हाणामारी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड (पश्चिम) मधील कुरार येथील पठाणवाडी परिसरात रविवारी सायंकाळी गुढीपाडव्यानिमित्त यात्रा सुरू होती. तेव्हा एका ऑटोरिक्षातील दोन जण भगवा झेंडा घेऊन मशिदीजवळून जात होते. गैरसमजातून काही लोकांनी दोघांनाही मारहाण केल्याने दोन्ही गटात हाणामारी होऊन परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तिकडे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात देखील बकरी ईदच्या दिवशी काही समाजकंटकांनी बीड,आणि जालना जिल्ह्यातील प्रार्थनास्थळांची विटंबना करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला होता. बीडमधील पाचेगाव येथे सोमवारी ईदनिमित्त काही लोकांनी मंदिरावर भगव्या ध्वजासह हिरवा झेंडाही लावला. मंदिरावर हिरवा झेंडा फडकवल्याने गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्येही दोन गटात हाणामारी झाली असल्याचे दिसून आले.
त्याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रामनवमीच्या दिवशी होणाऱ्या मोठ्या शोभायात्रेसाठी खरबरदारी दोन तब्बल दोन हजार पोलिसांचा फौजफाट नागपूरच्या रस्त्यावर तैनात असणार आहे. शिवाय ड्रोनच्या मध्यातून पोलिसांची रामनवमी शोभा यात्रेवर नजर असणार आहे. फक्त नागपुरच नाही तर राज्यातील इतरही प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.