शनिवारी रात्री घडलेल्या एका घटनेने राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी डोक्यात गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या पाऊलाने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मनोहरे यांनी स्वतःला गोळी घातल्यानंतर कुटूंबियांनी मनोहरे यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. ही धक्कादायक घटना काल रात्री अकराच्या सुमारास घडली. मनोहरे यांनी आपल्या राहत्या शासकीय निवासस्थानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर ही गोळी त्यांच्या डोक्यातून आर-पार बाहेर पडली आहे. या घटनेनंतर मनोहरे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लातूरच्या सह्याद्री खाजगी रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
आयुक्त मनोहरे यांनी गोळी झाडून घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्यांनी हे पाऊल का उचलेल? त्यांच्यावर कोणता दबाव होता का? अशा अनेक प्रश्नांची विचारणा आता होत आहे.