Ajit Pawar: गेली दहा वर्ष रखडलेल्या भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी १८ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. ९ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. तर यासाठी ७ ते १५ एप्रिल या कालावधीत अर्ज वाटप व दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. दाखल अर्जांची छाननी १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल. तर वैध नामनिर्देशनाची यादी १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल.
२१ जागांपैकी लासुर्णे, सणसर, उद्धट या गटांतून प्रत्येकी दोन जागा, तसेच अंथुर्णे, सोनगाव आणि गुणवडीमधून प्रत्येकी तीन जागा निवडल्या जाणार आहेत. ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास यांमधून प्रत्येकी एक जागा आणि महिला राखीव गटातून दोन जागा निवडल्या जाणार आहेत.
सध्या या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात याच छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासून झाली होती. त्यामुळे अजित दादांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र अजित पवार यांच्या एकहाती वर्चस्वाला कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
जाचक यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना साथ दिली होती. लोकसभेत मात्र त्यांनी सुनेत्रा पवाराचे काम केले. आता या कारखान्याच्या निवडणुकीत मात्र ते शरद पवार गटाला साथ देण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून ते शरद पवार गटाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यातच उद्योजक श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे आगामी छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.